बंगळूर बद्दल माझे मत

माझ्या मित्राच्या साखरपुड्याचा निमित्ताने आम्हाला बंगळूर ला जाता आलं. तसं ह्या पूर्वीसुद्धा मी एकटा ऑफिसमधून बंगळूर ला आलो होतो पण त्यावेळी फिरणं वगैरे तसं काही झालं नाही. ह्या वेळी मात्र मनसोक्त शहर पाहिलं.

शहर तसं मुंबई सारखंच. सर्वाथाने आपलेपण जपलेलं आणि उत्क्रांत झालेलं..इथल्या बऱ्याच गोष्टी मला आवडल्या आणि तत्क्षणी महाराष्ट्रात अश्या गोष्टी का  नाहीत ह्याची खंत सुद्धा वाटत होती. ह्यातुनच मी कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्या दोन राज्यांच्या राजधान्या आणि राज्यांची तुलना करण्यास उद्युक्त झालो.

शहरात मुख्यतः जवळपास सर्वच रस्ते दुपदरी आहेत. मुंबई सारखी लोकल ट्रेन इथे नाही, पण वाहनांची रहदारी मात्र तशीच.. त्यामुळे गाड्या आणि राज्यवाहतुक मंडळाच्या बस हेच ये-जा करण्याचे साधन आणि बरेच रस्ते हे one way आहेत. त्यामुळे ट्राफिक कमीतकमी व moving असतं. ( हा माझा अनुभव सुटी्चया दिवसांतील असल्यामुळे प्रत्यक्ष रोजचा अनुभव नक्कीच वेगळा असू शकतो). रस्त्याच्या दुतर्फा झाडे असतातच.. शहरात झोपड्या क्वचितच दिसतील. रस्त्यावर कचरा करणारी मंडळी निदान मी तरी पहिली नाहीत. शहराच्या आत सुद्धा भव्य अशी cubbon parkbangalore botanical garden आहेत.. त्यामुळे शहरातील प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात मदत होते.

शहराची मुख्य भाषा कन्नड. सर्वच्या सर्व कामकाज हे कन्नड ला प्राधान्य देऊनच केलं जातं आणि पर्यायी भाषा म्हणून इंग्रजी भाषा आहे. जे लोक पर्यटन व त्या संबंधित व्यवसायांशी निगडित आहेत त्यांना थोडीफार हिंदी येते, अगदी ते सुद्धा प्रयत्न करून बोलतात. एक गोष्ट आवर्जून मला जाणवली किंवा हे माझं मत होऊ शकेल की त्यांना हिंदी बोलता जरी येत असली तरी व्यवहारात त्यांनी हिंदीला कधीही मान्यता दिली नाही. म्हणजे गरज असल्यासच तिथे हिंदी बोलतील तीही तुटक..त्यातही कन्नड भाषेचे शब्दछटा दिसून येतातच. आपण मात्र महाराष्ट्रात हिंदीला आपल्या उरावर बसवलं, त्यामुळे मराठी महाराष्ट्रातील व्यवहारातुन जवळपास संपत चालली आहे व तिची जागा इंग्रजी आणि हिंदी घेत आहे.. वेळीच जर तिचे पुनरुत्थान करू शकलो नाही तर महाराष्ट्र आपली राजधानी तर गमावेलच पण हळू हळू आपली भाषा,आपली संस्कृती सुद्धा गमावून बसेल.

इथे प्रत्येक शाळेत अगदी ती आंतरराष्ट्रीय बोर्ड असली तरीही कन्नड भाषेचे शिक्षण अनिवार्य आहे. दुकानाचे फलक, तिथल्या उद्घोषणा हे सर्वच कन्नड भाषेतच असते. अगदीच पर्यायी भाषा म्हणून इंग्रजी सापडते. पण इथे महाराष्ट्रात कुठलही सरकार असो त्यांची मराठी बाबतची उदासीनता कायम असते. ह्या उलट आत्ताच सरकार मराठी-विरोधी पाऊल उचलतानाच जास्त दिसते तरीही मराठी मनांना जाग मात्र येत नाही. आत्ताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर जवळपास सर्वच भाषण व इतर सर्व पर्यायी social networks वर हिंदीलाच प्राधान्य देतात. असे कितीतरी मुद्दे आहेत ज्यांच्या बद्दल रोजच वेगवेगळ्या पद्धतीने निषेध करून सुद्धा आत्ताच सरकार त्याला दाद देत नाही.

सरकारी- निमसरकारी किवा विनासरकारी सर्वच संस्थांमध्ये कन्नड भाषेलाच प्राधान्य दिलं जात. अगदी आम्ही मॉल मध्ये कपडे खरेदी करायला गेलो तर तिथे सर्व जाहिरात सुद्धा सुंदर कन्नड भाषेतच होती. मध्ये मध्ये वाजणारी गाणी सुद्धा superb hot कन्नड गाणी.. एका -दोघांना वस्तूंबद्दल माहिती इंग्रजीतून विचारली तरीही त्यांनी उत्तरं कन्नड मधूनच दिली. मी नम्रपणे त्यांना म्हणालो की मला कन्नड येत नाही कृपया हिंदी किंवा इंग्रजीत सांगता येईल का? तर तिने चक्क नाही म्हटलं. मग माझ्या पत्नीने तिला इंग्रजीतून सांगितलं की तू बोल कन्नड मधून, आम्ही बघतो प्रयत्न करून काही कळतंय का? मग तिने सांगितलेली कन्नड माहिती त्यातले शब्द जुळवून जुळवून जे काही कळलं ते थोडंफार आम्ही समजलो.. हे असे बऱ्याच जागी घडले.. एकदा तर हॉटेल मध्ये जेवायला गेलेलो. तिथे counter वर बरीच गर्दी होती त्यातील इका माणसाने पलीकडील वाडप्याला coupon दिले व कन्नड मध्ये काहीतरी म्हणाला, पण तो समोरचा ढिम्म.. मग हयाने पुन्हा “Are you not kannadiga?”असा प्रश्न केला, तरी त्याला कळलेलं काही दिसलं नाही. शेवटी ती व्यक्ती डाफरली तशी पलीकडून दुसऱ्या एका वाडप्याने त्याला उत्तर दिले.. हे बघून मी गार च झालो. पण मला त्यांचा राग अजिबात आला नाही उलट त्यांचा हेवा वाटला, ही अशी मानसिकता आपल्याकडे देखील आली तर काय धमाल येईल.

प्रादेशिक संकुचितपणा ही महाराष्ट्राची ओळख नाही. हे राज्य नेहमीच भारताचं खड्ग-हस्त राहील. पण त्यासाठी आपलं स्वत्व टिकवणं अत्यंत गरजेचे आहे. वरील थोडेफार चांगले गुण जरी आपण मिळवले तरी आपण मराठी भारतीय म्हणून पुन्हा नाव उज्ज्वल करू. मराठी मुलांना त्यांच्या भाषेच्या आधारावर कामं मिळतील. इतर भाषेतून प्रादेशिक परीक्षा देण्याची गरज भासणार नाही त्यामुळे ते आपले विचार उत्तम प्रकारे मांडू शकतील. तसेच डोक्यावर बसून मिऱ्या वाटणाऱ्या परप्रांतीयांना चाप बसेल. असे अगणित फायदे होतील..

जसे महाराष्ट्रात महाराज हे प्रत्येक मराठी मनाचे आराध्य दैवत तसे कर्नाटकात बऱ्याच कन्नड लोकांना टिपू सुलतान आणि वडियार घराणे ह्याबद्दल नितांत प्रेम. वास्तविक पाहता टिपू सुलतान चा खरा इतिहास ह्या लोकांपर्यंत पोहोचवला जात नाही की लोकांनीच त्याची नराधमी कृत्ये स्वतःहून पुसून टाकली ह्याचा अर्थ लागत नाही. आणि वाडीयार घराणे तर तेथील संस्थानिक.. त्या पलीकडे त्यांचे योगदान निदान माझ्या वाचनात तरी नाही. असे असून सुद्धा त्यांचे वाडे, राजवाडे व तेथील इतिहास ह्याचे जतन कर्नाटक सरकार करते; इतकाच नाही तर त्यातूनच तेथील लोकांना अर्थकारण उपलब्ध करून दिले आहे. पण ह्या उलट ज्या महाराष्ट्राने आदर्श शासन, आदर्श राजा, लोकहितवादी हिंदवी साम्राज्य उभं करून लोकशाही आणि स्वतंत्र असा कानमंत्र सर्व भारतीयांच्या मनामनात रुजवला त्यांच्या इतिहासाचा वापर आज फक्त मते मिळवण्यासाठी, समाजात दुही माजवण्यासाठी केला जातो. त्यांच्या गडकिल्ल्यांची तर विचारणा करू नये इतकी दुरावस्था झाली आहे.

मैसूरला आम्ही तिथल्या चामराजेंद्र प्राणिसंग्रहालयात गेलो. इथे भारतातील जवळपास सर्वच प्राणी, पक्षी पाहायला मिळतील. पण ह्यातील वेगळेपण म्हणजे हे सर्व प्राणी कुठल्याही पिंजऱ्यात बंधिस्त न ठेवता त्यांना त्यांचे एक वेगळे असे परिसंस्था (Eco-System) दिलेले आहे जेणेकरून प्राण्यांना मानवी उपद्रव सहन करता लागू नये. त्यात आतमध्ये प्राण्यांना सुद्धा तुम्हीं दत्तक घेऊ शकता अशी प्रक्रिया राबवली जाते. जेणेकरून प्राण्यांबद्दल मनात आपुलकी निर्माण व्हावी. प्राण्यांचे इस्पितळ सुद्धा आहे. आतील रस्त्यांची आखणी इतकी व्यवस्थित कि तुम्हाला प्रत्येक प्राणी अगदी व्यवस्थित पाहता येतो व त्याची माहिती सुद्धा वाचता येते. हे असे सुदर संग्रहालय महाराष्ट्रात का नाहीत. इथल्या राणीची बाग आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असलेल्या प्राण्यांना अगदी लहानश्या पिंजऱ्यात डांबून कोंडून ठेवतात. तिथे समोर उभे राह्ल्यावर दुःर्गंधीनें माणसाचा सुद्धा श्वास गुदमरतो तिथे प्राणी कसे जगत असतील देवच जाणे.

Business Process and Services बद्दल म्हणायचं तर तिथेही बंगलोर व तेथील सकारात्मक सरकार हे दोघेही अव्वल ठरतात. ह्या शहरात बऱ्याच मोठ्या प्रमाणात तेथील नवीन पिढीने सुरू केलेले start ups आहेत, IT tech hub आहे.. सर्वांगीण विकास दिसून येतो. Service sector चा एक किस्सा सांगतो. आम्ही बंेगलोर ते मैसूर बस ने जाण्याचे ठरवले. अंतर जवळपास १५० किमी (सुमारे ३-४ तास). ३०० रुपयात अगदी व्यवस्थित खूप जबरदस्त अशी sleeper coach बस व रस्त्यात snacks आणि पाणी सुद्धा पुरविण्यात आले.. हे असे मुंबईकरांना मिळाले तर दिव्यच.. आनंदाश्रू थांबणार नाहीत😁😁.

तसे महाराष्ट्राचे- कर्नाटक सरकार सोबत आधीपासून मतभेद आहेत. त्यांची बरीच कारणं- संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अजूनही मागे राहिलेले बेळगाव, निपाणी सारखी गावं, सीमाभागातील मराठी विरुद्ध कानडी वाद, कावेरी प्रश्न, व असेच बरेच काही.. पण तरीही महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेतच.

 

 

 

 

2 thoughts on “बंगळूर बद्दल माझे मत”

  1. अतिशय उत्तम लिखान, आपल्या महाराष्ट्रात सुद्धा मराठी बोलीला प्रधन्या देता येईल. आणि त्याची सर्वात तुझ्या लेखणा पासून झाली आहे.

    Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s