माझी उंबरखिंड- सुधागड ट्रेक

Umbarkhind and Sudhagadमाझी हि तशी दहावी ट्रेक असावी. ट्रेक साठी मी नेहमीच तयार असतो त्यात गडकिल्ले म्हटल्यावर तर excitement ला माझ्या पार नसतो. ह्या वेळी चक्क भावाची सॅक घेऊनच सुरुवात केली. शिवशौर्य तुन अमितदादा ने सांगितलं होतं की ९ वाजता सर्वांनी भेटायचं नेहमीच्या ठिकाणी.. परळला; त्यामुळे ठरवलं की ऑफिसमधून थेट परळ लाच जायचं. मग आदल्या रात्री बॅग भरायचे उपाद्व्याप सुरू झाले. जवळ जवळ १० वाजले असतील ऑफिस मधून माझ्या boss चा फोन. आमचा एक app दुसऱ्या दिवशी live जाणार होता. तशी सर्व टेस्टिंग आधीच संपली होती पण अचानक issue दत्त म्हणून येतोच. ते संपेपर्यंत जवळजवळ ११ वाजले. आमच्या सौ ना बरं नव्हतं तर त्या आधीच गाढ झालेल्या☺ मग मी पण तशीच अर्धवट तयारी करून झोपलो म्हटलं दुसऱ्या दिवशी लवकर उठून करेन. ट्रेक चा दिवस उजाडला. मी झपाझप ५.३० ला उठून सकाळची तयारी आटपून मग बॅग भरून घेतली. ही असली बॅग घेऊन ऑफिस ला जाण्यासाठी कांदिवलीहुन ८.१४ पकडणं, म्हणजे लय भारी कसरत. पण आता ठरवलं तर मागे फिरणं नाही. मग ऑफिसमध्ये नेहमीप्रमाणे काम आटपून ७.३० पर्यंत कसाबसा वेळ काढून निघालो. कुर्ल्या ला पोहोचल्यावर कळलं की ट्रेन उशिरा आहेत 😫😡 मग काय कसाबसा मारामारी करत ट्रेन मध्ये चढलो. तिथून दादर- परळ गाठलं. उतरल्यावर एक मैत्रीण भेटली तिच्यासोबत थोडं हॉटेल मध्ये खाऊन आमच्या ट्रेक च्या बसमध्ये जाऊन बसलो आणि प्रवास सुरु झाला💙
रात्री १ च्या आसपास आम्ही कुरवंडे येथे पोचलो. तेथे एका मंदिरात आश्रय घेतला. थोड्या गप्पा झाल्यावर सर्व तयारी करून गाढ झोपी गेले त्यातही कोणी त्यांच्या झोपेचा सूर लोकांना ऐकवत होते आणि इतरांची झोप घालवत होते. अचानक कुणाचातरी फोन वाजला बघतो तर ६ वाजले होते😞 मग कंटाळत कंटाळत उठून तयारी सुरू केली. माझ्या मैत्रिणीचा एक बूट चक्क कुत्र्यांनी पळवला त्याची शोधाशोध झाली.. तो एका चाणाक्ष मित्राने लांबूनच हेरला. मग बॅग वगैरे भरून, चाह- बिस्कीट घेऊन आम्ही ट्रेक सुरू केला, तेव्हा जवळजवळ ७.३० वाजले होते.
सह्यांचल हा असाही स्वतःच एक अभेद्य किल्ला. घाटमाथ्यातून, डोंगरातून, रानावणातून रस्ता काढत कधी चुकत कधी विचारत आम्ही पुढे पुढे जात होतो. मध्ये मध्ये थांबून शार्दूल दादा आम्हाला उंबरखिंडीच्या लढाईचे महत्व आणि इतिहास सांगत होता. ते ऐकताना सोबत भौगोलिकता समजून घेता येत असल्यामुळे त्या काळात नेमकी कशी लढाई झाली असेल त्याचा अंदाज लावता येत होता.. एका ठिकाणी काहीतरी खाऊन घ्यावं म्हणून एका सावली शेजारी सर्वच स्थिरावले. मग कुणाचे ब्रेड-जॅम, अंडी, तर कुणाचे कोळंबी मसाला आणि श्रीखंड बाहेर आले. ह्या सर्वांवर एक मस्त ताव मारून झाला आणि मंडळी पुढच्या वाटेल लागणार इतक्यातच मुद्रा खेळता खेळता पडली.
IMG_20180224_171923.jpg
मुद्रा म्हणजे शार्दूल दादाची जेमतेम ७-८ वर्षांची कन्या. हे एक अजबच रसायन आहे. अतिशय छोटी पण कमालीची धीट अशी ही. तिने आत्तापर्यंत जवळ जवळ ४०-४५ ट्रेक पूर्ण केलेल्या आहेत. भरपूर चालून आम्ही जवळ जवळ १ वाजता चावणी (उंबरखिंड छावणी) ह्या गावात पोहोचलो.. आत्ता जबरदस्त भूक लागली होती म्हणून तिथे एक काकांच्या घरी जेवणाचा बेत झाला.
तिथे मस्त दाबून जेवण झालं. त्यानंतर थोडा आळस येऊ लागला पण तेवढ्यातच शार्दूल दादाने सर्वांना पुढे निघायला सांगितलं. तसाच उठलो आणि गाडीत बसलो म्हटलं इथे तरी अर्धा तास आराम असेल पण लगेच १० मिनिटात आम्ही शॉर्य स्तंभाकडे पोचलो.
तो स्तंभ पाहून सर्व थकवाच निघून गेला. अगदी सुंदर, नदीच्या खोऱ्यात बनवलेलं हे स्तंभ पाहून आम्ही सर्वच सुखावलो. थोडा वेळ एकमेकांचे फोटो काढून नंतर एकत्र आलो. शार्दूल दादा इथे घडलेल्या शेवटच्या लढाईबद्दल final episode सांगू लागला. तेव्हा खरच प्रचिती आली की महाराजांची दूरदृष्टी आणि लष्करी डावपेच किती जबरदस्त होते. त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सुदधा महाराजांचे मावळे किती चिवट आणि काटेकोर होती.
थोडक्यात सांगतो.
शाईस्तेखानाची मोहीम स्वराज्यावर चालून आली. स्वतः शाईस्तेखान इथे पुण्यात तळ ठोकून होता. त्याच्या मनात होत की पुण्याची हवा मस्त, इथे शांतीने जगू. दरम्यानच्या काळात त्याने स्वतःच्या मुलीचं सुद्धा लग्न लावून दिल लालमहालात. पण जसजशे औरंगजेबाचे खलिते येऊ लागले तशे शाईस्तेखानाचे धाबे दणाणले. त्याने चाकण च्या किल्ल्याची मोहीम हाती घेतली. तसा हा किल्ला अगदी लहान. पण अवघ्या साडेतीनशे मावळ्यांनी हा किल्ला मोघलांच्या एकवीस हजारच्या फौजेविरुद्ध छपन्न दिवस लढवत ठेवला. त्यावेळी शाईस्तेखानाला त्याची चूक कळू लागली की जर हा इतकासा किल्ला २ महिने मराठे लढवत असतील तर स्वराज्य संपवणे ह्या जन्मात तरी शक्य नाही. शेवटी त्याने कार्तलाबखानाला उत्तर कोकणच्या मोहिमेवर पाठवले. त्याच्या सोबत लढवय्या रायबाघन स्त्री होती. कोकाटे आणि गाढे ह्यांसारखे मराठे सरदारसुद्धा होते. सोबत अंदाजे ३० हजार सैन्य आणि दारुगोळा होता. सैन्य बलाढ्य होते पण तो शत्रूला समजू शकला नाही. समोर महाराजांच वृक युद्ध किंवा गनिमी कावा होता.
पावसाळ्याचे दिवस होते. महाराजांनी कोकणात उतरायच्या दुसर्या रस्त्यांवर आपल सैन्य पेरून ठेवल आहे अशी हूल उडवली आणि थोडी दाखवण्यापुरती झाम्ब्डाझांबड देखील केली. त्यामुळे खांनाच सैन्य उंबरखिंडतूनच पुढे सरकाव अशी महाराजांची योजना कार्याला आली. जस जस सैन्य डोंगर उतरू लागलं रायबाघन ला आपण शत्रूच्या पंजात अडकत चाललो आहोत हे कळू लागलं. रस्ता बराच निमुळता आणि चहुबाजूने डोंगर आहे. महाराजांनी पुढून मागून खानाच्या सैन्याला कोंडीत पकडलं. वरून चारही दिशांनी बाणांचा मारा होत होता. अखेर रायबाघनने कर्तलाब्खानाला समजावून माघार घेण्यास सांगितले. असा महाराजांनी कमीत कमी तीन हजार मावळ्यानिशी तीस हजार सैनिकांना गारद केले ते हि एकही मावळा न गमावता.
हि झाली संक्षिप्त गोष्ट. तर आपण पुढे जाऊ.
तिथून आम्ही निघालो सुधागडाच्या दिशेने. वाटेत ठाकूरवाडीला थांबलो. गाडी सोडली आणि थोडी आवरावर करून चढायला सुरुवात केली. सर्व वजन घेऊन गड चढण हे मला कधीच आवडत नाही. पण तरीही दोन- सव्वादोन चढून गेल्यावर आम्ही म्हळावर पोचलो. गड तसा भरपूर मोठा. ह्याच दुसर नाव भोरापगढ. आख्यायिका अशी आहे कि ह्या गडावर पुरातनकाली भृगु ऋषींचा आश्रम होता आणि त्यांनी इथे भोराई देवीची स्थापना केली म्हणून ह्याच नाव भोरपगढ. पुढे महाराजांनी १६४८ मध्ये ह्याचे नाव बदलून सुधागड असे केले. असे म्हटले जाते कि महाराजांनी राजधानी म्हणून ह्या हि किल्ल्याचा विचार केला होता. इथे महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील काही सदस्यांचे महाल देखील आहेत. रात्री ९ च्या सुमारास आमची जेवण वगैरे आटपली त्यानंतर सर्वच थकले होते म्हणून झोपायची तयारी सुरु झाली. पण आम्ही मित्र इतक्यात झोपणारे नव्हतो म्हणून विरंगुळा म्हणून फोनवर Ludo खेळत चौघेजण बसलो. ११ पर्यंत timepass करून मग आम्ही झोपी गेलो. सकाळी ६ वाजता उठून तयारीला लागलो. तसा हा दिवस निवांत होता. आठ-साडेआठला मस्त मिसळपाव हासडून नंतर गड पाहायला बाहेर पडलो. गडावर बर्याच इमारतींचे अवशेष आहेत. बरेचसे वीरगळ आणि इतरही शिळा आहेत. गडाला असलेला पाच्छापूर च्या दिशेला असलेला महादरवाजा देखील पाहिला. हा महादरवाजा आज जो आपण पाहतोय तो दुर्गप्रेमी संघटनांमुळे. काही वर्षांपूर्वी हा दरवाजा संपूर्णपणे गाळाखाली गाडला गेला होता. गडाला एक टकमक टोक हि आहे. खूपच जबरदस्त. किल्ल्यावरून आपल्याला तैलबैलाचा घाट सुद्धा दिसतो. दुपारच जेवण आटपून आम्ही गड उतरायला लागलो.
IMG_20180225_091903.jpg
खाली पायथ्याशी थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही पुढे निघालो. वाटेत बल्लाळेश्वर ला डोक टेकून आम्ही परतीच्या वाटेवर लागलो.. सोबत ट्रेकच्या आठवणी आणि पुढच्या ट्रेक ची आस घेऊन…..